sanjay mantri

sanjay mantri
2020-02-10 06:44:34 (UTC)

आनंद ! प्रेषक संजय क्षीरसागर


२१
२०१८
आनंद !
प्रेषक संजय क्षीरसागर (शुक्र., २०/०७/२०१८ - १९:०२)
प्रकटन जीवनमान
आनंद या शब्दानं प्रत्येकाच्या मनात वेगवेगळा गोंधळ माजवलेला आहे. आनंद म्हणजे काय याची नक्की कुणालाच कल्पना नाही. कुणाला कशात आनंद वाटतो तर कुणाला कशात ! म्हणजे एखाद्या अतिरेक्याला वर्ल्ड ट्रेड सेंटरला विमान धडकवलं की आनंद होईल, तर कुणा सामान्याला आमरस-पुरीत स्वर्गीय सुख मिळेल. कुणी प्रेमिक एकमेकाच्या सहवासात आनंदून जातील, तर कुणाला सत्तारूढ झाल्यावर सर्वसिद्धी प्राप्त झाल्यागत आनंद होईल. एखाद्या लहानपणी आई-वडिलांपासून ताटातूट झालेल्याला आई भेटल्यावर परमानंद होईल, तर एखाद्या भिकाऱ्याला एकवेळचं पोटभर जेवण मिळालं तर बाकी काहीही नकोसं वाटेल. कुणाला कैलास-मानसच्या यात्रेत स्वर्गसुख वाटेल तर कुणी परिक्रमेच्या अतोनात पायपिटीत आनंद मिळतो म्हणेल. अर्थात, अतिरेक्याचा आनंद जितका खरा तितकाच भिकाऱ्याचाही खरा आहे आणि परिक्रमेच्या छळात आनंद नाही तर तो ऐय्याशीच्या युरोप टूरमध्येच आहे असा दावा कुणीही करू शकत नाही.


थोडक्यात, प्रत्येकाचा आनंद वेगवेगळा आहे आणि तो वेगवेगळ्या वेळीआणि वेगवेगळ्या प्रकारे होतो अशी भ्रामक समजूत लोकांनी करून घेतली आहे. त्यामुळे प्रत्येक जण आनंदाच्या शोधात आहे आणि अमकं घडलं की आपल्याला आनंद होईल या आशेवर बहुतेक वेळ सांप्रत स्थिती सोसतो आहे. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर सुट्टीच्या दिवशी आनंद होईल या आशेवर कामाचे दिवस ढकलतो आहे.

बहुतेक वेळा आनंद झाला तरी तो काही क्षण टिकतो आणि मग व्यक्ती पुन्हा पूर्वपदावर येते. तर असा हा आनंदाशी लपंडाव आयुष्यभर चालू असतो. काय कारण असेल याचं ? या अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा उहापोह करण्यासाठी हा लेख.

तर पहिली गोष्ट अशी की आनंद ही घटना नाही, ती स्थिती आहे. म्हणजे एवरेस्ट सर केल्याचा हिलरीला आनंद होतो या घटनेचा आनंद त्या विजयात नाही; तर त्या क्षणी हिलरीची जाणीव, जी वर्षानुवर्ष एक दुर्दम्य इच्छेत अडकली होती; ती फिरून स्वतःप्रत आल्यामुळे आहे. अर्थात, आनंद होण्यासाठी प्रत्येक वेळी दुर्दम्य इच्छाच असायला हवी असं नाही. भिकाऱ्याची जाणीव, जी असहाय्य भुकेनं वेधून घेतली होती, ती पुरेसं अन्न मिळाल्यावर पुन्हा निर्वेध होते आणि तो देखिल एडमंड ज्या स्थितीत एवरेस्टच्या शिखरावर आला; त्या स्थितीत फुटपाथावर असताना येतो. त्यामुळे प्रत्येकाचा आनंद वेगवेगळा आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद वेगवेगळा आहे ही भ्रामक समजूत आहे. आनंद एकच आहे आणि तो निर्वेध चित्तदशेचा परिणाम आहे; किंवा निर्वेध चित्तदशा म्हणजेच आनंद आहे.

ही निर्वेध चित्तदशा आपल्याला स्वतःशी जोडते आणि ही स्वतःशी जोडलं जाण्याची स्थिती म्हणजे आनंद आहे. इच्छा जाणिवेचा रोख व्यक्तीला अपेक्षित असणाऱ्या घटनेकडे वळवते, त्यामुळे इच्छा जितकी दुर्दम्य तितका तीच्या पूर्तीसाठी करावा लागणारा प्रयास खडतर आणि तितकी जाणीव पुन्हा मूळ स्थितीत येणं दुष्पूर. त्यामुळे प्रत्येक इच्छा काल आणि प्रयास या दोन भ्रामक गोष्टी निर्माण करते आणि त्यामुळे व्यक्तीला आनंद मिळवण्यासाठी प्रयास करावा लागतो आणि वाट पाहावी लागते.सरते शेवटी जेव्हा इच्छापूर्ती होते तेव्हा जाणीव पुन्हा पूर्वपदावर येते, ती निर्वेध होते आणि आपण स्वतःशी जोडले जातो; आपल्याला आनंद होतो !

या चक्रात न सापडण्यासाठी संत इच्छा सोडण्याचा मार्ग सुचवतात त्यामुळे सामान्य व्यक्तीची आणखीनच गोची होते. कारण इच्छापूर्तीनं आनंद होईल या अभिलाषेवरच तर व्यक्तीजगत असते. म्हणजे जो काही थोडाफार आनंद, अधूनमधून होतो तो पण घालवायला कोण राजी होईल ? आणि त्यामुळे सामान्य व्यक्ती अध्यात्माच्या नादी लागत नाही.


यात थोर समजल्या जाणाऱ्या संतमंडळींनी काही इच्छा तर अशा प्रदान करून ठेवल्या आहेत की ज्यांची पूर्ती न त्यांना झाली न कदापिही होऊ शकते आणि असंख्य लोकांनी युगानुयुगं, अशा इच्छापूर्तींसाठी आयुष्य वेचली आहेत. असा नामी ठेवा म्हणजे देव भेटण्याची इच्छा किंवा त्याचा कृपावर्षाव होण्याची कामना ! आता मुळात देव मानवी कल्पनेव्यतिरिक्त कुठेही नाही त्यामुळे तो कुणालाही भेटणं असंभव. थोडक्यात, या इच्छेत जाणीव मूळ स्थितीत येणं अशक्य कारण जितका प्रयास तितकं नैराश्य आणि जितकं नैराश्य तितकी जाणीव स्वतःपासून वेधली गेलेली. जितकी जाणीव वेधलेली तितका कालाचा भास तीव्र आणि जितका कालाचा भास तीव्र तितका प्रयासाचा उन्माद दुर्दम्य ! त्यात काही मंडळी त्यांना देव भेटला असं ठासून सांगतात, पण त्याचा अर्थ इतकाच असतो की त्यांना त्यांच्या कल्पनेनं इतकं भ्रमिष्ट केलंय की आता वास्तव आणि कल्पना यातलं तारतम्य करण्याची क्षमता संपली आहे.

तर सांगायचा मुद्दा असा की आनंद ही घटना नसून स्थिती आहे. ती घटनेचा किंवा इच्छापूर्तीचा परिणाम नसून जाणिवेची निर्वेध दशा किंवा मूळ स्थिती आहे. आणि अगदीच थोडक्यात सांगायचं तर ती स्थिती म्हणजे खुद्द आपणच आहोत ! त्यामुळे स्वतःचं स्वतःशी जोडलं जाणं म्हणजे आनंद.
-----------------
ज्या क्षणी जे हवं असतं, ते त्या क्षणी मिळालं की आनंद होतो... पण मग लगेचच पुढची गोष्ट हवी, ही इच्छा होते, की त्यामागे धावणे सुरु....

आहे हा क्षण असाच आहे, आणि तो अटळ आहे, हे समजून, उमजून राहायला जर जमलं, तर प्रत्येक क्षणी त्या आनंदाच्या स्थितीची अनुभूती मिळू शकेल, हे ऐकलंय. पण समजतं, कळतं, पण उमगत, वळत नाही, अशीच माझी बर्‍याच वेळा परिस्थिती असते!
-------------
मुळात आनंदाचा शोध हीच चूक आहे कारण आनंद ही कायम स्थिती आहे, तो घटनेचा परिणाम नाही. दुःख ही स्वतःपासून विलग झाल्याच्या भ्रामक समजुतीमुळे उद्भवलेली परिस्थिती आहे, ते घटनेमुळे ओढवत नाही. एकदा का हा उलगडा झाला की आपण कायम स्वतःशी कनेक्टेड राहतो, कायम आनंदी राहतो.

तुम्ही म्हटलंय तो " स्वीकार " हा संतांनी सांगितलेला मार्ग आहे, पण त्याला मन राजी होत नाही, त्यामुळे दुःखाचं कारण " अस्वीकार " नाही, तर " गैरसमज " आहे. आपण स्थिती आहोत, व्यक्ती नाही हा उलगडा आपल्याला घटनेपासून अलग करतो कारण घटना आकारात घडते, निराकाराला काहीही होत नाही.

हे जग चतुर्मिती आहे; त्यात शरीर, मन आणि घटना या त्रिमितीत काम करतात आणि आपण घटनेची चतुर्थ मिती आहोत. त्यामुळे घटना काहीही असो, तीचा आपल्यावर कोणताही परिणाम होत नाही आणि ही " निष्परिणाम " स्थिती आनंद आहे !
------------
लक्षात राहणं किंवा विसरणं ही मेंदूची प्रक्रिया आहे आणि आपण त्या प्रक्रियेचे जाणते आहोत. आठवत नाही हा स्मृतीचा भाग झाला, पण आठवत नाही हे ज्याला कळतंय ते आपण आहोत. माझे लेख वाचकांना स्वतःप्रत आणतात त्यामुळे त्यांचं स्मृतीरेखाटन होऊ शकत नाही. म्हणजे लेख वाचल्यावर तुम्ही आनंदी होऊ शकता पण नक्की कशाचा आनंद झाला हे सांगता येत नाही कारण आनंद निष्कारण आहे.

स्वतःशी जोडलं जाणं ही बाय डिफॉल्ट स्थिती आहे, त्यासाठी परिश्रमाची गरज नाही इतकंच मी सांगायचा प्रयत्न करतो त्यामुळे लेखन सोपं होतं.




Ad: